9158750500 info@itakop.com

केपीआय

30
Sep

केपीआय

“तू जर घरी येऊन झोपाच काढणार असशील तर उद्यापासून सरळ सिटी बस किंवा सायकल वापर. तुझा अभ्यासाचा वेळ वाचावा म्हणून तुला टू व्हीलर घेऊन दिली. वाचलेला वेळा झोपेत वाया जाणार असेल तर फुकट पेट्रोल खर्च तरी नको.” बारावीच्या महत्वाच्या वर्षात अभ्यासाने, एकंदरीत टेन्शनने काही सुधरायचे बंद झाल्यामुळे म्हणा अथवा धावपळीचा थकवा वाढत असल्याने म्हणा,  घरी येऊन झोपा काढणाऱ्या आपल्या मुलांना,

“आधी कॉलनीतला गणपती आहे म्हणून गप बसले पण त्यानंतर सलग आठ दिवस हेच चाललेय..शनिवारच्या टेस्ट्स चे निकाल येऊ देत, मग तुला सांगते काय ते..” अशा प्रकारचे, नेमक्या आकडेवारी सकट, दम देणाऱ्या आईचे उदाहरण बऱ्याच घरात आढळेल.

घरात एकहाती सारे सांभाळणाऱ्या गृहिणी कडे, रेसोर्सेस युटीलाय्झेशन वर अशी नेमके लक्ष ठेवणारी नजर मात्र एखाद्या उद्योगाच्या सिइओ इतकीच तल्लख असते याची प्रचीती असे घरगुती ओरडे ऐकताना कायमच येत असते.

शाळा कॉलेजातील टेस्ट्स चे मार्क्स मुलांना अभ्यासातील तयारी कोठे वाढवायला हवी हे सांगतात. हेच मार्क्स  शिक्षकांना कोणता विध्यार्थी  कशात कमी आहे हे ओळखून त्या दृष्टीने विशेष लक्ष देणे सोपे व्हावे यासाठी मदत करतात. आणि हेच मार्क्स  पालकांना नेमके काय ‘लक्ष’ द्यायला हवे तेहि सांगतात !

केपीआय म्हणजे Key Performer Indicators, उद्यागांची स्वतः ठरवलेली मार्क्स लिस्ट !
आपल्या उद्योगाची घडी नीट  बसली आहे कि नाही, अपेक्षित प्रोसेस आणि सिस्टिम्स योग्य पद्धतीने कार्यान्वित आहेत का नाहीत, आदि प्रश्नांची उत्तरे उद्योगाच्या कर्त्याकरवित्यास, जर त्याने योग्य पद्धतीने केपीआय ठरवून आपल्या सिस्टीम मध्ये बसवून घेतले तर, रोजच्या रोज मिळू शकतात. ह्या केपीआय च्या मदतीने काही प्रोसेस मध्ये अपेक्षित बदल घडवून आणल्यास एकंदरीतच कामकाजातील तत्परता वाढून नफावृद्धी होऊ शकते.

उदाहरणार्थ, हावर्ड च्या स्टडी ऑफ रीस्पोंस नुसार एखाद्या कंपनीच्या विक्री विभागाने जर एखाद्या विक्रीविषयक चौकशीस एका तासाच्या आत उत्तर दिले तर त्या कंपनीस ती ऑर्डर मिळायची शक्यता ७ पटीने जास्त असते. त्त्यामुळे अशा कंपनीच्या चालकांसाठी ‘लीड रीस्पोंस टाइम’ हा केपीआय सेट करून तो हळू हळू एका तासावर आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करता येऊ शकतात.

टोटल वर्किंग कॅपिटल (TWC) हा एक अत्यंत महत्वाचा व म्हणून उद्योगजगतात सर्वात जास्त वापरला जाणारा केपीआय. तुमच्याकडील एकूण स्टोक अधिक तुमचे बाजार येणे वजा एकूण देणे असा सुटसुटीत हिशेब असलेला हा केपीआय तुमचे सारे व्यवहार जर ओंनलाईन असतील तर तुम्हाला सतत मिळत राहतो.

केपीआय सेट करणे व त्यानुसार धोरण ठेऊन आपल्या उद्योगाची कार्यक्षमता सतत वाढवत ठेवणे हे सध्याच्या अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात अत्यंत गरजेचे आहेत. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे  आणि इआरपी सारख्या संकल्पनेच्या स्वीकारामुळे हे घडणे सहज शक्य आहे. इआरपीच्या पायावर केपीआय चा कळस चढवणे शक्य झाल्यास  केलेली गुंतवणूक एकदोन वर्षातच तुम्हाला नुसताच आरोआय (ROI) न मिळवून देता उद्योगाचा नफा  अनेकपटीने  वाढलेला दाखवून शकते.

इआरपी सोफ्टवेअर सोल्यूशन व्यवस्थित इम्प्लीमेंट करण्याचे कष्ट सार्थकी लावण्याचे अत्यंत बहुमोल काम केपीआय करतात. उद्योग असुदे अथवा संसार रिसोर्सेस नेमके कसे वापरले जातात हे सतत कळणे आणि केपीआय सारख्या  माध्यमातून त्याचा योग्य अर्थ लावता येणे कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदतच करतात.

संसारातील अनेक आघाड्या सांभाळणाऱ्या आया हे सारे घेऊनच जन्माला आल्यात कि काय अशी शंका वाटावी इतके साधर्म्य केपीआय च्या वापरामुळे आपल्याला सतत जाणवू शकते. आणि ह्या मुळे नेमकी  आकडेवारी देत समजावणाऱ्या आणि क्वचित चीड चीड करणाऱ्या आईमुळे मुलाचे मार्क्सही  वाढतात आणि पेट्रोलचा खर्चही आटोक्यात राहतो !

(‘तंत्रज्ञान’, महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर दि. ३० सप्टेंबर , २०१३)

Vinay Gupte
President
IT Association of Kolhapur
Compserv Consultants Pvt. Ltd. (CCPL)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *